नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- जेलरोड महाजन हॉस्पिटल समोर आज सकाळी बर्निंग रिक्षाचा थरार पाहावयास मिळाला.
रिक्षा चालक यांनी समयसूचकता दाखवून बाहेर पडल्याने त्याचा जीव बचावला मात्र या आगीत रिक्षा मात्र जळून खाक झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहंमद सुफरान पठाण (वय 58, रा. मगर चाळ, जेलरोड) हे आपल्या ताब्यातील सी एन जी रिक्षा क्रमांक MH 15JA 2377 घेऊन जेलरोड कडून नाशिकरोड कडे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास येत होते. कडक उन्हामुळे रस्ते तापले होते व मोठ्या प्रमाणत उकाडा जाणवत होता.
महाजन हॉस्पिटल समोर येताच पठाण यांना गाडीतुन काही तरी जळण्याचा वास येऊ लागला व काही प्रमाणात धूर येऊ लागला. पठाण रिक्षा रस्त्याच्या बाजूला घेत असतांना रिक्षाने पेट घेतला तोच पठाण यांनी रिक्षा बाहेर उडी घेतली. आराडा ओरड झाल्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी आग विझावण्याचा प्रयत्न केला.मात्र आग मोठया प्रमाणत भडली.
काही नागरिकांनी अग्निशमक दलाला कळवले, दलाचे जवान एल पी बेंद्रे, एस एम जाधव, आर आर काळे, पी डी पुरी, राजाभाऊ गोसावी व मंगेश जाधव यांनी एक बंबच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीत रिक्षा पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने रिक्षामध्ये प्रवासी नव्हते, नाहीतर मोठी अघटित घटना आज घडली असती.
नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बर्निंग रिक्षाचा थरार अनुभव अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. जेलरोडच्या दोन्ही मार्गांवर नागरिकांनी गर्दी केली होती.