जुन्नर तालुका बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा हादरल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका परिसरात आज (ता. ११ एप्रिल) पहाटे जुन्नर तालुक्यात एका चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द गावात बिबट्याने एका चिमुकल्या मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये संंस्कृती कुळेकर या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. गावातील संपत मोरे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये धनगर कुटुंब वास्तव्यास होते.
आज पहाटे या कुटुंबातील चिमुकलीवर बिबट्याने हल्ला चढवला. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. शेतापासून अर्धा किलोमीटर अंतरावर या चिमुकलीचा मृतदेह आढळला. या धक्कादायक घटनेने परिसरामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबतची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. मागच्या पंधरा दिवसात बिबट्याचा चिमुकल्या मुलांवरील हा दुसरा हल्ला आहे. या घटनांनी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.