दैनिक भ्रमर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचेच डोळे पाणावेल अशी एक हदयद्रावक घटना समोर आली. एक ३० वर्षीय व्यक्ती आपल्या नवजात मृत बाळाला बॅगेत घेऊन कार्यालयात पोहोचला आणि आपल्या बाळाला पुन्हा जिवंत करण्याची विनवणी अधिकाऱ्यांकडे करू लागला.
"माझ्या बाळाला जिवंत करा.. माझी बायको मुलाला मागतेय... मी काय सांगू?" असा मृत बाळासह वडिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयात हताश आक्रोश पाहून कार्यालयातील कर्मचारी सुन्न झाले. विपिन गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून, त्याचा शोक अनावर झाला होता. तो मोठ्याने रडत होता. एका खासगी रुग्णालयाने पत्नी रुबी गुप्ताला चुकीचे औषध दिल्याने आपल्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याने केला.
हे ही वाचा...
विपिन गुप्ता रुग्णालयावर आरोप करताना म्हणाले, पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची परवानगी मागितली, पण ते पैशांची मागणी करत राहिले. जेव्हा माझ्या पत्नीची प्रकृती अधिकच बिघडली, तेव्हा त्यांनी तिला रुग्णालयातून बाहेर काढून रस्त्यावर आणून सोडले. त्यानंतर आम्ही तिला दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी सांगितले की, पहिल्या रुग्णालयाने दिलेल्या 'चुकीच्या औषधामुळे' बाळाचा गर्भातच मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा...
या घटनेनंतर जिल्हाधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी पीडित महिलेच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारी प्रशासन घेईल, असे आश्वासन दिले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक तपासणीत काही त्रुटी आढळल्याने तात्काळ संबंधीत रुग्णालय सील करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, रुग्णालयातील सर्व रुग्णांना जिल्हा रुग्णालयात सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.