आपल्या लग्नसोहळ्यात छान दिसायचं, छान एन्ट्री मारायची मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पाडायचा असं प्रत्येकच वधूला आणि वराला वाटतं. पण अनेकदा हे आनंदाचे क्षण दुःखात बदलतात. उत्तर प्रदेश येथील बाराबाकी या गावात लग्नसोहळ्याचा आनंद हाणामारीत बदलला. संतापलेल्या नवरदेवाने चक्क नवरीलाच लाथ मारली आणि या हाणामारीच्या येथूनच सुरुवात झाली.
बाराबाकी या गावातील रामनगर परिसरात लग्नाचा आनंदाचा सोहळा सुरू असताना कार्यक्रमादरम्यान स्टेजवर सेल्फी घेण्याच्या वादातून हा गोंधळ उडाला. सेल्फीवरून संतापलेल्या नवरदेवाने स्टेजवरच नवरीला लाथ मारल्याची आणि सासऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. लाठी-काठ्यांनी एकमेकांना मारहाण करत खुर्च्याही एकमेकांच्या अंगावर फेकल्या गेल्या. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शत्रुघ्न (व्यवसाय – मूर्तिकार) यांनी आपल्या मुलगी निशाची लग्नगाठ विशालसोबत बांधण्याचे ठरवले होते. शुक्रवारी रात्री वरात मोठी वाजत गाजत पोहोचली आणि नवरदेव आणि नवरी स्टेजवर आले. फोटो आणि सेल्फीसाठी मोठी गर्दी झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्टेजवरच फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. वारंवार चेहरा पुसत असलेला नवरदेव विशाल गर्दी हटवण्याचा प्रयत्न करत होता आणि सेल्फी घेण्यास नकार करत होता, मात्र कोणी ऐकले नाही.
याच दरम्यान विशालचा संयम सुटला आणि त्याने संतापात नवरीलाच लाथ मारली. या प्रकारामुळे वातावरण तापले आणि दोन्ही बाजूंमध्ये मारहाण सुरू झाली. लग्नस्थळी एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे व्यथित झालेल्या नवरदेवाने सुरुवातीला लग्नास नकार दिला. मुलीच्या कुटुंबीयांनी नवरदेव नशेत असल्याचा आरोप केला. मात्र उशिरा रात्री दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली. नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी केल्यानंतर उर्वरित विधी पार पडले आणि मुलीला सासरी पाठवण्यात आले.