प्रियकराच्या सांगण्यावरून एका नववीत शिकणाऱ्या मुलीने आपल्याच आई वडीलांचं आयुष्य धोक्यात घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळून ही मुलगी प्रियकराला भेटायला जायची. पण तिचं हे पितळ एक शेवटी उघडं पडलंच. प्रेमात आंधळा झालेला व्यक्ती काय करू शकतो याचाच संतापजनक प्रत्यय याठिकाणी समोर आला आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून ही संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीचे वडील पेंटिंगचं काम करतात. ते मुंबईमध्ये त्यांचं काम करतात. महिन्याभरापूर्वीच ते त्यांच्या गावी गेले होते, दरम्यान तेव्हा त्यांना मुलीच्या वागण्यामध्ये बदल दिसून आला. ती सतत फोनवर बोलत बसायची. धक्कादायक म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला विचित्र गुंगी यायची आणि गाढ झोप लागायची. वडिलांना संशय आल्याने त्यांनी पत्नीसोबत मिळून मुलीवर पाळत ठेवण्याचं ठरवलं आणि इथेच मग चक्र फिरलं.
मुलीने ३ जानेवारीच्या रात्री नेहमीप्रमाणे सर्वांना जेवणातून गुंगीचं औषध दिलं. मात्र, आई-वडिलांनी ते खाल्लंच नाही तर ते बाजूला लपवून ठेवलं आणि झोपेचं सोंग घेतलं. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुलीने सर्वांना झोपलेलं पाहिलं, खात्री केली आणि ती हळूच शाल पांघरून घराबाहेर पडली. ती बाहेर पडताच वडिलांनी तिचा पाठलाग केला असता, ती २०० मीटर अंतरावर राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाच्या घरात शिरल्याचं दिसून आलं. संतापलेल्या वडिलांनी दोघांना रंगेहाथ पकडलं.
वडीलांनी आणि घरातील सदस्यांनी मुलीची चौकशी केली आणि अखेर सत्य समोर आलं आणि वडलांच्या पायाखालची जमीन सरकली. ती म्हणाली की, गेल्या एक वर्षापासून ती या तरुणाच्या संपर्कात होती. तो तरुणच तिला तिच्या घरच्यांच्या जेवणात टाकण्यासाठी झोपेच्या गोळ्या आणून द्यायचा, ज्या ती गुपचूप जेवणात मिसळायची. घरचे बेशुद्ध झाल्यासारखे झोपले की ती प्रियकराकडे जायची आणि त्याच्यासोबत वेळ घालवायची.
या प्रकरणानंतर गावात पंचायत बोलवण्यात आली होती. मुलाने पुन्हा असं करणार नाही अशी कबुली दिली, पण तो सुधारला नाही. उलट, जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या घरातील व्यक्तींना त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर तिच्या वडिलांनी गुलरिहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी २२ वर्षीय आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.