उत्तर-मध्य नायजेरियात शुक्रवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती आज समोर आली आहे. येथे दोन मजली शाळा कोसळली असून, वर्ग सुरू असताना हा अपघात झाला. या अपघातात 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
वास्तविक, विद्यार्थी प्लॅट्यू राज्यातील सेंट्स एकॅडमी कॉलेजमध्ये अभ्यासासाठी आले होते. वर्ग सुरू झाल्यानंतर काही वेळातच शाळेची इमारत कोसळली. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये १५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची मुले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस प्रवक्ते अल्फ्रेड अलाबो यांनी सांगितले की, "एकूण 154 विद्यार्थी अडकले होते, परंतु त्यापैकी 132 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या विद्यार्थ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे."
अपघातानंतर लगेचच बचाव आणि आरोग्य कर्मचारी तसेच सुरक्षा दलांना घटनास्थळी तैनात करण्यात आले. अपघातानंतर अनेक ग्रामस्थ शाळेजवळ जमा झाले. याठिकाणी उपस्थित लोकांमध्ये आरडाओरडा सुरू होता,तर काहीजण मदत मागताना दिसत होते. याशिवाय बचाव कर्मचारी ढिगाऱ्यांखालील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.