उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. नवऱ्याने ५ महिन्यांच्या गर्भवती बायकोची चाकूने गळा चिरून हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविशंकर आणि सपना यांचे लग्न याच वर्षी जानेवारी महिन्यात झाले होते. लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले. सपना गर्भवती राहिली. नवऱ्यासोबत होणाऱ्या भांडणामुळे आणि सासरची मंडळी सतत त्रास देत असल्यामुळे सपना आपल्या बहिणीच्या घरी राहायला गेली.
सपनाचा नवरा रविशंकर शनिवारी तिथे पोहचला. नवऱ्याला पाहून सपना घाबरली. त्यानंतर रविशंकरने खोलीचा दरवाजा बंद केला. यावेळी रविशंकरने सपनाला डोळे बंद कर मी तुझ्यासाठी सोन्याचा हार आणला असल्याचे म्हणाला. तिने डोळे बंद करताच त्याने तिचा गळा चिरला. सपनाचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील सर्वजणांनी तिच्या खोलीकडे धाव घेतली. तोपर्यंत सपनाचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी आरोपीला अटक केली.
पोलिस चौकशीदरम्यान, आरोपी रविशंकरने बायकोच्या हत्येमागचं कारण सांगितलं. सपनाचे तिच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्याने केला. या प्रकरणात मृत सपनाच्या कुटुंबीयांनी आरोपी नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप करत 'तिचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. माहेरून २ लाख रुपये घेऊन ये असे म्हणत नवरा तिला त्रास देत होता. तिला तिचे सासू-सासरे आणि दोन नणंद मारहाण करत होते. त्यांनी तिला घरातून बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केला होता.', असा आरोप हत्या झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.