भारतातील लोकप्रिय मंदिरांपैकी एक असलेले उत्तर प्रदेशातील मथुरा येथील सुप्रसिद्ध बांके बिहारी लाल हे मंदिर पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहे. मंदिराचे खजिना मानले जाणारे तोषखाना हा सर्वांमध्ये उत्सुकतेचे कारण बनले होते. मागील अर्ध शतकाहून अधिककाळ बंद असलेल्या या दरवाजामागे मंदिराची मोठी संपत्ती असल्याचा दावा केला जात होता.

बांके बिहारी मंदिराचा सुमारे १६० वर्षांचा जुना आणि मौल्यवान 'खजिना' धनत्रयोदशीच्या शुभ दिनी उघडण्यात आला आहे. तब्बल ५४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मंदिराचे हे विशेष कपाट (गर्भगृहाजवळील तोशखाना) शनिवारी उघडण्यात आले. संपूर्ण बंदोबस्तामध्ये आणि सुप्रीम कोर्टाच्या टीमच्या साक्षीने बांके बिहारी मंदिराच्या संपत्तीचा हा खजिना उघडण्यात आला. मात्र आतमध्ये जे काही आढळलं त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला.
याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, खजिन्यात सोने आणि चांदीच्या नाण्यांनी भरलेले कलश मिळाले आहेत. हा खजिना मंदिराच्या गर्भगृहाच्या खालील तोशखानामध्ये असल्याचा दावा केला जात आहे, जो बांके बिहारी यांच्या सिंहासनाखाली आहे.या खोलीत सोने-चांदीचे दागिने, सोन्याचे कलश, चांदीची नाणी, हिरे-जवाहिरात आणि नवरत्न अशा अनेक मौल्यवान वस्तू असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतिहासकारांच्या मते, १८६४ मध्ये वैष्णव परंपरेनुसार मंदिराचे बांधकाम झाले, तेव्हा गर्भगृहाखाली हा तोशखाना तयार करण्यात आला होता.
खजाना असलेला कक्ष अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे, आत विंचू, साप किंवा विषारी वायू असण्याची शक्यता होती. त्यामुळे, खजिना उघडताना विशेष खबरदारी घेण्यात आली. खजिना शोधण्यासाठी गेलेल्या टीमने मास्क आणि सुरक्षा उपकरणे वापरली. खजिन्याच्या आसपास दोन लहान साप आढळले. त्यामुळे, वन विभाग आणि सर्पमित्रांची (स्नॅक कॅचर) टीम तिथे उपस्थित होती. विषारी वायूची शक्यता लक्षात घेऊन कक्षात कडुनिंबाची पाने ठेवण्यात आली होती. आवश्यक वैद्यकीय मदत देण्यासाठी वैद्यकीय पथकही खबरदारी म्हणून सतर्क ठेवण्यात आले होते.
गर्भगृहाजवळील हा दरवाजा उघडण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत होती. सर्वोच्च न्यायालयाकडून अधिकार प्राप्त झालेल्या उच्चाधिकार व्यवस्थापन समितीच्या आदेशानंतर हा खजिना उघडला जात आहे. खजिना उघडण्याचा निर्णय 29 सप्टेंबर रोजी घेण्यात आला. मथुरेचे जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह (जे समितीचे सचिव आहेत) यांनी १७ ऑक्टोबर रोजी खजिना उघडण्याचा आदेश जारी केला होता. या समितीत मंदिर व्यवस्थापनाव्यतिरिक्त सिव्हिल जज, ऑडिटर आणि पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे.