हरिद्वारमधील प्रसिद्ध आणि पवित्र अशी मानली जाणारी मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार , मंदिराच्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी होऊन सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. देशभरातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे जमले होते. भाविकांची गर्दी वाढल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवार आणि रविवार या सलग दोन सुट्ट्यांमुळे मंदिर परिसरात भाविकांची संख्या अचानक वाढली होती.
यामुळे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून काही रस्त्यांवर वाहतूक व भाविकांची हालचाल नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू होते. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो रस्ता जत्रेच्या वेळी पूर्णपणे बंद केला जातो.
मात्र गर्दी झाल्याने हा रस्ता सुरु करण्यात आला. त्याच रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेत २० ते २५ भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान प्रशासनाकडून अद्याप दुर्घटनेचा सविस्तर अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यातील गर्दी नियंत्रणाच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या दुर्घटनेमुळे हरिद्वार शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.