उत्तर प्रदेश सरकारने अंडी उत्पादक आणि ग्राहकांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 1 एप्रिलपासून राज्यात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर 'एक्स्पायरी डेट' (कालबाह्यता तारीख) असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जे व्यापारी किंवा शेतकरी या नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी किंवा शेतकऱ्यांची अंडी एकतर नष्ट केली जातील किंवा त्या अंड्यांवर 'खाण्यासाठी योग्य नाही' असा शिक्का मारला जाईल. अनेक ठिकाणी जुनी आणि खराब झालेली अंडी विकली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे.
अंडी नक्की किती काळ टिकतात?
अनेकदा आपल्याला अंडी किती जुनी आहेत हे कळत नाही. तज्ज्ञांच्या मते, सामान्य तापमान (३०°C): अंडी केवळ २ आठवडे चांगली राहतात.
थंड तापमान (२ ते ८°C) - फ्रिजमध्ये ठेवल्यास ५ आठवड्यांपर्यंत अंडी वापरता येतात.
उत्तर प्रदेशात सध्या आग्रा आणि झाशी येथे मुख्य शीतगृहे आहेत. अन्न सुरक्षा नियमांनुसार अंडी आणि भाज्या एकाच जागी ठेवता येत नाहीत. त्यामुळे, सुविधा मर्यादित असल्या तरी सरकारने आता स्वच्छ शब्दांत ताकीद दिली आहे की, 'सुविधा नाही' ही सबब चालणार नाही, नियमांचे पालन करावेच लागेल.