नायगावजवळ वन विभागाकडून बिबट्या जेरबंद
नायगावजवळ वन विभागाकडून बिबट्या जेरबंद
img
Dipali Ghadwaje
सिन्नर (वार्ताहर) :- तालुक्यातील नायगाव खोऱ्यात धुमाकूळ घालणाऱ्या  बिबट्यांपैकी नायगाव कांदा मार्केटजवळ आणखी एक बिबट्या सलग दुसऱ्या दिवशी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे; मात्र आणखी लहान-मोठे तीन-चार बिबटे अद्याप परिसरात फिरत असल्याचे समजते.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दि. 10 ऑक्टोबर रोजी एका बिबट्याला रात्री 2 वाजता जेरबंद केले. यामध्ये अजून तीन पिले बाहेर असल्याचे समजते; मात्र मोठा बिबट्या जेरबंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सिन्नर तालुक्यातील नायगावचे खोरे परिसरात असलेल्या जोंगलटेंभी, देशवंडी, ब्राह्मणवाडे, जायगाव, वडझिरे व सोनगिरी या गावांची मुख्य बाजारपेठ नायगाव आहे. नायगावहून नाशिकरोड, सिन्नर, सायखेडा, निफाड येथे जाणाऱ्या शेतकरी व वाहनचालकांची  संख्या जास्त आहे.

त्यामुळे लोकांची ये-जा चालूच असते. गोदावरी नदी आणि उसाचे वाढलेले क्षेत्र यामध्ये दबा धरून हा बिबट्या आपले सावज शोधतो. सिन्नर वन विभागाने ‌‘बिबट्या शोधा अन्‌‍ पकडा' मोहीम सुरू केली होती. याचदरम्यान रात्रीच्या वेळीस देशवंडीचे भगवान बर्के यांच्या तीन शेळ्या व सायखेडा रोडला त्र्यंबक भांगरे यांच्या शेळीची शेळीची शिकार बिबट्यांनी केली. त्यामुळे मादी व नर बिबट्यासह त्यांची बछडे असेल असा अंदाज नायगावचे वनरक्षक संजय गिते, यांनी व्यक्त केला होता.

यामध्ये मध्यरात्री रात्री 2 वाजता  नायगाव कांदा मार्केटजवळ त्र्यंबक भांगरे यांच्या वस्तीवर त्याला पकडण्यात आले. उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, मनीषा जाधव, अनिल साळवे, संजय गिते, गोविंद पंढरी, बालम कुराडे, रोशन जाधव व मधू शिंदे या वन खात्याच्या पथकाने ही कामगिरी केली.

गेल्या महिनाभरापासून या भागात बिबट्याने मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडलेला होता. जवळपास नऊ हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाले होते. बऱ्याच ठिकाणी पाळीव प्राण्यांवर देखील हल्ला केला होता. त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरत होते. सायंकाळी सातच्या नंतर घराबाहेर पडण्यास कोणीही धजावत नव्हते.
त्यामुळे वन विभागाने देखील कठोर पावले उचलत पाच पिंजरे बंदोबस्तासाठी लावले होते. त्याचबरोबर सहा ट्रॅप कॅमेरा लावण्यात आलेले होते. 

दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी आदल्या दिवशी ज्या ठिकाणी पहिला बिबट्या जेरबंद झाला, त्याच ठिकाणी लावलेल्या दुसऱ्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी वनरक्षक संजय गिते आणि झेप सामाजिक विचारमंच नायगाव सदस्य उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group