गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बिबट्याने मानवी वस्तीत हल्ला करून अनेकांना मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडत आहे. नाशिक पाठोपाठ पुण्यातही या घटना वाढल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात लहान मुलांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे, ग्रामस्थांकडून वन विभागावर संताप व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे घराच्या अंगणात चिमुकला झोक्यावर बसून आनंद घेत होता, तितक्यात मांजरीचा पाठलाग करत बिबट्या थेट कंपाऊंडमध्ये शिरल्याचं पहायला मिळालं. काही क्षणातच चिमुकल्याने प्रसंगावधान राखत घरात धाव घेतली. कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने बिबट्या घाबरून पळून गेला.
बिबट्याच्या या थरारक हालचाली सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.