वर्धा : आष्टी वनपरिक्षेत्रातंर्गत जुना अंतोरा मौजा परिसरात शेताच्या बांधावर मृतावस्थेत बिबट्या आढळून आला आहे. साधारण पाच दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र उष्माघाताने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून मृत बिबट्याचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत.

गेल्या आठवडाभरापासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. यातच वन्य प्राण्यांना पिण्यास पाणी मिळत नसल्याने पाण्याच्या शोधात भटकंती करत असतात. अशातच आष्टी वनपरिक्षेत्रातंर्गत जुना अंतोरा मौजा परिसरात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. मृत बिबट्याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. यानंतर पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
पाण्याअभावी मृत्यूची शक्यता
दरम्यान बिबट्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर बिबट्याला पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. त्याआधी त्याने काहीतरी शिकार खाल्ली असावी. यानंतर पाण्याच्या शोधात फिरत असताना पाण्याअभावी त्याचा मृत्यू झाला असावा.असा अंदाजही वनविभागाने व्यक्त केला. मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर पाच दिवसांपासून बिबट मृतावस्थेत पडून होता. ही वनविभागासाठी गंभीर बाब आहे. वनविभागाचे लक्ष नसल्याने अशा घटना घडत आहे.