नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक रोड परिसर जवळील चेहडी, चाडेगाव येथे शेतमळे भागात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना धास्तावून सोडणाऱ्या बिबट्याचा अखेर बंदोबस्त करण्यात आला आहे. चेहेडी येथील नगरसेवक पंडित आवारे यांच्या शेतात आज वनविभागाच्या पथकाने सापळा रचून तीन वर्षाच्या मादी बिबट्याला यशस्वीरीत्या जेरबंद केले.
२२ ऑक्टोबर रोजी या शेतात काम करत असताना भारत दगू आवारे यांच्या समोरून बिबट्या गेला होता. त्यानंतर परिसरात बिबट्याचे दर्शन आणि डरकाळ्यांमुळे शेतकरी शेतमजूर व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही स्थिती पाहता नगरसेवक पंडित आवारे यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या.
शुक्रवारच्या रात्री पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने शेतात पिंजरा लावून सतत लक्ष ठेवले. अखेर शनिवारी सकाळी तीन वर्षांची मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकली. पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितपणे वनविभागा च्या वनाधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमने ताब्यात घेत त्यास म्हसरूळ येथील टीटीसी सेंटरमध्ये हलवण्यात आले त्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले आहे.
या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तथापि, वनविभागाच्या माहितीनुसार या भागात अजूनही काही बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी वडनेर, आर्टलरी सेंटर, पिंपळगाव आदी भागांत सहा ते सात बिबट्या वन विभागाने जेरबंद केले होते.