नाशिकरोड (प्रतिनिधी):- देवळाली कॅम्प जवळील नानेगाव येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला.
नानेगाव येथील भवानी नगर मधील मनोहर बबन शिंदे यांच्या शेत मळ्यात गेल्या आठवड्याभरात बिबट्याने हैदोस घातला होता. त्यामुळे शेतकरी, नागरिक यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत. लहान मुलांना बाहेर काढणे जिकरीचे झाले होते.
या बाबत मनोहर शिंदे यांनी वन विभागाचे अधिकारी अनिल अहिरराव, विजयसिह पाटील यांच्याशी संपर्क केला. पाहणी करून वन विभागाने शिंदे यांच्या गट नंबर 434 या पडीक जागेवर पाच दिवसांपूर्वी पिंजरा लावला.
आज पहाटे पिंजऱ्याच्या दिशेने बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येऊ लागला. शिंदे यांनी कळवल्या नंतर अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिह पाटील, वाहनचलक अशोक खानझोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आठ ते नऊ वर्षाचा नर जातीचा बिबट्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यास सुरक्षितरित्या गंगापूर येथील रोप वाटिका येथे उपचार करून लवकरच त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
देवळाली कॅम्प या भागात बिबट्या दिसल्याचे प्रकार वाढत असल्याने वन विभागात कॅम्प येथील आर्मी क्षेत्रात, नवजीवन सोसायटी, राहुरी, वंजार वाडी, लोहशिंगवे या ठिकाणी पिंजरे लावले आहे. नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.