नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथील अण्णा गणपती मंदिरा मागे आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास पशुधनावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्यास युवकाने स्वतःच्या जीवाचा विचार न करता दगड मारून हाकलले.
विहितगाव-देवळाली गाव येथील प्रसिद्ध अण्णा गणपती नवग्रह मंदिरा मागील भुडकी रोड, वृंदावन कॉलनी येथे मक्याच्या शेताच्या बाजूला बाळा धोंगडे यांचे गाई, वासरे, म्हशी बांधलेल्या होत्या. आज सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास धोंगडे तेथून जात असताना मक्याच्या शेतीतून बिबट्या पशुधनावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना बाळा धोंगडे यांचे लक्ष गेले.
क्षणाचा विलंब न करता स्वतःच्या जिवाची बाजी लावीत त्यांनी हातात दगड घेऊन बिबट्याच्या दिशेने कूच केली. ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने रहिवासरी यांनी त्या दिशेने धाव घेतली असता बिबट्या मक्याच्या शेतातून शेजारील उसाच्या शेतात गेला. बिबट्याच्या पायाचे ठसे घटनास्थळी मिळून आले आहे.
स्थानिक मनसे पदाधिकारी संजय हंडोरे, ॲॅड. नितीन पंडित यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनपाल उत्तम पाटील यांच्याबरोबर संपर्क साधला.
दोन दिवसांपूर्वी जय भवानी रोडवरील मनोहर गार्डनमधील एका बंगल्यात बिबट्याने प्रवेश करीत पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. महिन्यापूर्वी नाशिकरोडच्या आनंदनगर या भागात एका घरी जाणाऱ्या कामगारांवर हल्ला केला व त्याला जबर जखमी केले. नंतर औटे मळा व लोणकर मळा व परिसरात बिबट्याने थैमान घातले होते. त्यानंतर वन विभागाने सुमारे पंधरा दिवस या भागात रात्री गस्त घालीत नागरिकांना सूचना केल्या. खोले मळा व लोणकर मळा या भागात पिंजरा लावण्यात आला.
मात्र त्यानंतर बिबट्या ना पिंजऱ्यात आला ना कोणाला दर्शन दिले. सायंकाळनंतर लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये, सकाळी व रात्री फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी हातात काठी, बॅटरी ठेवावी, असे आवाहन वनाधिकारी पाटील यांनी नागरिकांना देऊन समुपदेशन केले. नागरिकांच्या मनात बिबट्याने पुन्हा धडकी भरली आहे. या भागात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ॲॅड. नितीन पंडित,संजय हंडोरे व नागरिकांनी केली आहे.