नाशिक : मुंबईनाका परिसरातील गायकवाडनगरमध्ये काल रात्री एका महिलेने बिबट्याला पाहिले होते.
त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. यानंतर बुधवारी (दि.१७) दुपारी वनविभागाने येथील जानू माळी यांच्या मालकीच्या जागेत पिंजरा लावला आहे. या बिबट्याला जेरबंद करणे हे मोठे आव्हान वनविभागा समोर आहे.
शहराचा मध्यवर्ती व वर्दळीचा परिसर असलेल्या मुंबईनाका येथील महामार्ग चसस्थानकाच्या पाठीमागे गायकवाडनगर भागात रात्री येथील सविता पोटिंदे या भांडी घासण्यासाठी घराबाहेर आल्या असता त्यांना घराजवळ गवतामध्ये बिबट्या दबा धरून बसलेला दिसला.
त्यांनी बिबट्याला बघताच हातातील भांडी फेकून घरात धाव घेतली होती. यानंतर वनविभागाच्या पथकाला माहिती मिळताच रात्री गस्ती पथक घटनास्थळी पोहचले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी सुमीत निर्मळ, वनपाल अनिल अहिरराव यांनी आज दुपारी येथील सुनील पोटिंदे यांच्या वस्तीजवळ पिंजरा लावला.
नागरिकांनी या भागात सायंकाळनंतर व पहाटे सुद्धा एकटे फिरू नये, घरांभोवती वाढलेले रानगवत काढून परिसर स्वच्छ करावा, अशा सूचनाही वनखात्याच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.