जेलरोड-शिवाजीनगरमध्ये कोयते-तलवारी घेऊन लूट करणारे हल्लेखोर ताब्यात; पोलिसांचे ‘ऑपरेशन रिक्षा’ यशस्वी
जेलरोड-शिवाजीनगरमध्ये कोयते-तलवारी घेऊन लूट करणारे हल्लेखोर ताब्यात; पोलिसांचे ‘ऑपरेशन रिक्षा’ यशस्वी
img
Chandrakant Barve
नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : जेल रोड-शिवाजीनगर परिसरात युवकाला कोयते व तलवारीचा धाक दाखवून लूट करणाऱ्या तसेच म्हसोबा मंदिराजवळ गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांना नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान पोलिसांनी रिक्षा चालक व प्रवासी अशा वेषात कामगिरी पार पाडत संशयितांना गाफील धरले.

१३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता धनंजय दीपक सागवान (वय १८) याला ७ ते ८ तरुणांनी लोखंडी कोयते, तलवारी व बाहुबली प्रकारची हत्यारे दाखवून धमकावले. त्याच्याकडील मोबाईल, घड्याळ, चैन असा ऐवज हिसकावून नेला. शिवाय परिसरातील वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्यात आली. सागवान यांच्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.

ही घटना अत्यंत गंभीर असल्याने पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांनी गुन्ह्याचा तपास गतीमान करण्याच्या सूचना दिल्या.

तपासादरम्यान पोलिस हवालदार विशाल पाटील व महेंद्र जाधव यांना माहिती मिळाली की काही संशयित साईनगर येथील मोकळ्या मैदानावर येणार आहेत. संशयित आडदांड असल्याने पथकाने युक्ती आखली. हवालदार विशाल पाटील यांनी रिक्षा चालक, तर महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे हे प्रवासी बनले. संशयितांचा ठावठिकाणा निश्चित झाल्यावर ‘पत्ता विचारण्याच्या बहाण्याने’ रिक्षा थेट त्यांच्या जवळ नेण्यात आली आणि क्षणातच अचानक छापा टाकून संशयीतांना ताब्यात घेतले.

कारवाईत हल्लेखोर राकेश उर्फ राका संपत लोंढे, प्रजल उर्फ पज्या गुंजाळ, प्रथमेश उर्फ नन्या शेलार आणि एक अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून लुटलेला ऐवज, तसेच ६ ते ७ धारदार कोयते, तलवारी व बाहुबली हत्यारे जप्त करण्यात आली. इतर पाच आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विजय टेमघर, महेंद्र जाधव, विशाल कुवर, समाधान वाजे, नाना पानसरे, नितीन भामरे, अजय देशमुख, संतोष पिंगळ आदींच्या पथकाने केली.

नाशिक शहरात वाढत्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्यारांचा साठा जप्त झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group