नाशिकरोड (प्रतिनिधी) :- बंगल्याच्या पाठीमागील दरवाजा तोडून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी महिलेच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची सुमारे तीन लाख रुपये किमतीची दोन मंगळसूत्रे बळजबरीने चोरून नेल्याची घटना सामनगाव रोड येथे घडली. सततच्या घटनांमुळे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
याबाबत शिवाजी पोपटराव म्हस्के (वय 54) यांनी यांनी माहिती दिली, की सामनगाव रोडवरील पॉलिटेक्निक कॉलेजसमोर फिर्यादी म्हस्के हे पत्नी लता म्हस्के, आई सत्यभामा पोपटराव म्हस्के, भाऊ राम पोपटराव म्हस्के व या दोन्ही भावांची पाच मुले असे सर्व जण एका बंगल्यात राहतात. काल (दि. 14) रात्री सर्व कुटुंबीय जेवण झाल्यानंतर आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले.
त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी बंगल्याच्या मागील घराचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर स्वयंपाकघरातील भांड्यांची उचकापाचक करून ती घराबाहेर आणून ठेवली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बेडरूमकडे वळविला. त्यापैकी त्यांनी काही बेडरूमच्या दरवाजाच्या कड्या लावून घेतल्या, तर दरोडेखोरांचे काही साथीदार हे बंगल्याबाहेर निगराणी करीत होते. दरोडेखोरांच्या या आवाजामुळे शिवाजी म्हस्के यांना जाग आली.
त्यावेळी दरोडेखोरांपैकी एकाने शिवाजी म्हस्के यांना काही तरी धारदार शस्त्राचा धाक दाखवून धमकावले. त्यावेळी म्हस्के यांच्या पत्नी लता म्हस्के या बाहेर आल्या असता दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यात असलेले सहा तोळे वजनाचे मंगळसूत्र व सोन्याची पोत असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. दरम्यान, मध्यरात्री घडलेल्या या दरोडासदृश जबरी चोरीचा तपास करण्याचे मोठे आव्हान नाशिकरोड पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, शिंदे गाव येथील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, तसेच देविदास वांजळे यांचा पदभार दुय्यम निरीक्षक पवन चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.