जादा नफ्याच्या आमिषाने व्यावसायिकाने गमावले 40 लाख रुपये
जादा नफ्याच्या आमिषाने व्यावसायिकाने गमावले 40 लाख रुपये
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर ट्रेडिंग करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह त्याच्या पत्नीची 40 लाख रुपयांना फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तेजस साहेबराव पगार (रा. तलाठी कॉलनी, शिवाजीनगर, कळवण) हे व्यावसायिक आहेत. आरोपी गणेश आनंद काळे (रा. गणेश व्हॅली, सिन्नर फाटा, नाशिकरोड) याने फिर्यादी पगार यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यावर विश्‍वास ठेवून फिर्यादीने पत्नी शरयू तेजस पगार हिच्या नावे डीमॅट खाते उघडले. त्याद्वारे दरमहा 8 टक्के रकमेवरील परतावा देण्याचे सांगितले.

त्यानुसार फिर्यादीचा मित्र आनंद दाणी यांच्या सांगण्याप्रमाणे पगार यांनी पत्नी शरयू पगार हिच्या नावे ऑनलाईन झिरोदा या ब्रोकिंग फर्मममध्ये डीमॅट खाते उघडले व 25 लाख रुपयांची रक्कम डीमॅट खात्यामध्ये जमा केली. त्यानंतर आरोपी गणेश काळे याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली.

त्यावेळी आरोपी काळे याने सांगितले, की आनंद दाणी याचे डीमॅट खाते मी ऑपरेट करतो. त्यांना दरमहा सात ते आठ टक्के परतावा देतो. तुम्हीदेखील तुमचे डीमॅट खाते मला वापरायला द्या. तुम्हालासुद्धा 7 ते 8 टक्के रकमेचा परतावा देतो, असे सांगितले. त्यावर विश्‍वास ठेवून फिर्यादी पगार यांनी पगार यांनी त्यांच्या पत्नीच्या डीमॅट खात्याचा क्रमांक व पासवर्ड आरोपी काळे याला दिला. सुरुवातीला गणेश काळे हा डीमॅट खात्यावर आठ टक्के नफा देत होता. त्यानंतर जून 2024 मध्ये काळे याने पगार यांना फोन करून सध्या मार्केट चांगले आहे.

त्यामुळे खात्यात रक्कम टाकल्यास चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो, असे सांगितले. त्यानुसार वेळोवेळी फिर्यादी यांनी रक्कम जमा केली. अशा प्रकारे वेळोवेळी जादा नफ्याचे आमिष दाखवून फिर्यादी पगार यांना पत्नीच्या डीमॅट खात्यावर 1 कोटी 5 लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. या व्यवहारापोटी फिर्यादीचा विश्‍वास संपादन करण्यासाठी आरोपी काळे याने 65 लाख 8 हजार 991 रुपयांचा परतावा दिला; मात्र उर्वरित 39 लाख 77 हजार 9 रुपयांची आर्थिक फसवणूक करून परतावा देण्यास नकार दिला.

हा प्रकार मे ते नोव्हेंबर 2024 दरम्यान घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group