देणगी गोळा करण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस
देणगी गोळा करण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस
img
दैनिक भ्रमर

मनमाड : प्रतिनिधी, गुलशन ए गरीब नवाज मस्जिद, भारतनगर, मनमाड येथे देणगी गोळा करण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मस्जिदचे ट्रस्टी आमीन सलीम खान यांच्याविरोधात दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) पोलीस उपनिरीक्षक हसन ताहेर सैय्यद यांनी कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ता. २९ रोजी एका गोपनीय बातमीदाराने पोलीस उपनिरीक्षक सैय्यद यांना एक क्यूआर कोड पाठवला. यासंदर्भात माहिती देताना सांगण्यात आले की, हा क्यूआर कोड मस्जिदच्या अधिकृत बँक खात्याचा नसून, तो ट्रस्टी आमीन सलीम खान यांच्या वैयक्तिक खात्याचा आहे. मस्जिदमध्ये नमाजासाठी येणाऱ्या लोकांना आमीन खान याने  मस्जिदच्या नावाने देणगी मागवून, प्रत्यक्षात ती रक्कम त्यांच्या खाजगी खात्यात जमा केली.

पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी स्वतः क्यूआर कोड स्कॅन करून दोनदा रक्कम ट्रान्सफर केली. पहिल्यांदा ५०० रुपये आणि नंतर ९ मे रोजी १०० रुपये पाठवण्यात आले. दोन्ही वेळा रक्कम आमीन खान यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मधील वैयक्तिक खात्यावर जमा झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकारामुळे देणगीदारांची फसवणूक झाली असून, ट्रस्टच्या अधिकृत खात्याचा वापर न करता वैयक्तिक खात्यावर देणगी गोळा केल्याने आमीन सलीम खान यांच्याविरुद्ध फसवणूक व अपहार केल्याचा आरोप  ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. भारताबाहेरून काही व्यवहार झाले आहेत का याचा तपास दहशतवादी विरोधी पथक करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group