निफाड (भ्रमर प्रतिनिधी) :
भरदुपारी सूर्य आग ओकत असताना सगळीकडे शांतता पसरली होती. उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे रस्ते निर्मनुष्य होते. नेहमीच माणसांची वर्दळ असणाऱ्या सायखेडा पोलिस ठाणे परिसरात शांतता होती. कर्मचारी आपापल्या कामात दंग होते. तितक्यात ८४५९९०२४८३ या नंबर वरून डायल करून ११२ हेल्पलाईनवर फोन करून एका अज्ञात व्यक्तीने मांजरगाव शिवारात गोदावरी नदीलगत बॉम्ब तयार करण्यात येत असून, ते बॉम्ब शिडों आणि पंचवटी येथे लावून स्फोट घडवून आणला जाणार आहे, असे सांगितले अन् सायखेडा पोलिसांची एकच धावपळ सुरु झाली.
पोलिस शिपाई मिलिंद शिरसाठ यांनी सदर कॉलवरील संभाषण ऐकले. सायखेडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विकास ढोकरे यांनी आपल्यासोबत तत्काळ कर्मचारी घेऊन मांजरगाव गाठले. गावातील रस्ते, नदीच्या परिसरात सदर कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. परंतु, कोणीही संशयित आढळून आले नाही. कर्मचारी मिलिंद शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निनावी फोन करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, कॉल प्राप्त होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास ढोकरे यांनी पथकासह शिवरे फाट्याकडे रवाना झाले. त्यांनी निफाडचे पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक निकम यांना मोबाईल नंबरची खात्री करण्यास सांगितले. सदर मोबाईल नंबर निफाड पोलिसांना हव्या असलेल्या संशयित आरोपी गांधी उर्फ बाळा भास्कर गांगुर्डे (रा. उगाव, ता. निफाड) याचा असल्याची खात्री होताच त्याचे तांत्रिक विश्लेषण करून संशयितास पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले, गांगुर्डे हा निफाड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात फरार होता. पोलिस उपनिरीक्षक शशिकांत सैंदाणे अधिक तपास करीत आहेत.