अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना, गणेश विसर्जन करताना युवक वाहून गेला
अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना, गणेश विसर्जन करताना युवक वाहून गेला
img
Dipali Ghadwaje
नाशिकमध्ये आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा कमालीचा उत्साह दिसून येत आहे. सकाळपासूनच सार्वजनिक मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. अशातच अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली. निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील एक युवक पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना  घडली. 
 शिरवाडे वणीगावाजवळील पाचोरे वणी येथील नेत्रावती नदी काल सायंकाळी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच चांदोरी व पिंपळगाव अग्निशमन दलाच्या जवानांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता युवकाचा शोध घेतला जात होता, मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने युवकाचा शोध लागला नाही. 

गणेश विसर्जन करण्यासाठी पिंपळगाव बसवंत-चांदवड मार्गावरील शिरवाडे वणी येथील राज उमेश वाघ हा पाचोरे वणी परिसरात असलेल्या नेत्रावती नदीतीरी गेला होता. यावेळी गणेश विसर्जन सुरु असताना अचानक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाय घसरून नदीत पडला. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने नद्यांना पूर आला आहे, यामुळे सदर युवक पाण्याचा प्रवाहात वाहून गेला. उपस्थित स्थानिकांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र सापडला नाही. 

तात्काळ चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन व पिंपळगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवान बेपत्ता युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. मात्र पाण्याचा जोरदार प्रवाह व पावसामुळे युवकाचा तपास उशिरापर्यंत लागलेला नव्हता. या घटनेनंतर विसर्जनाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विसर्जना दरम्यान काळजी घ्या!
आज राज्यभरासह नाशिक जिल्ह्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज सकाळी अकरा वाजेपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात होणार आहे. त्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच विसर्जन ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर कृत्रिम तलावांची सुविधा देखील प्रशासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी नदीपात्रात उतरू नये, काळजीपूर्वक विसर्जन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group