नाशिक : राज्यात आता बऱ्यापैकी थंडी जाणवायला सुरुवात झालीये. अनेक भागांमध्ये हवेत एवढा गारवा वाढलाय की, पंख्याचीही गरज भासत नाही. जवळपास सर्वच जिल्ह्यांमधील किमान तापमानात घट झालीये. तापमानाचा पारा खाली येत असून नाशिक शहरात देखील तापमानात घट होताना दिसत आहे.
गेल्या 24 तासात नाशिकचा पारा 2 अंशांनी तर निफाडचा पारा 3 अशांनी घसरला आहे. यामुळे नाशिककर चांगलेच गारठले असून नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
नाशिकमध्ये शुक्रवारी किमान 10.6 तर कमाल 27.5 तापमानाची नोंद करण्यात आली. तर शनिवारी नाशिकचा पारा 8.9 अंशावर पोहोचला आहे. तर निफाडमध्ये किमान 7 अंश सेल्सिअस इतक्या नीच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वात नीच्चांकी तापमानाची नोंद आज करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात नाशिकचा पारा दोन अंशाने घसरला आहे. 10. 6 अंशावरून 8.9 अंशावर पारा घसरला आहे तर निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअस वरून 7 अंशावर आला आहे. ओझर मधील तापमान 6.6 अंशावर गेल्यानं नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील 24 तासांकरीता थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढत आहे.