राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार?  हवामानाचा अंदाज काय सांगतो? वाचा संपूर्ण बातमी
राज्यात ऐन हिवाळ्यात पाऊस, गारपीट होणार? हवामानाचा अंदाज काय सांगतो? वाचा संपूर्ण बातमी
img
Dipali Ghadwaje
मुंबई : ऐन हिवाळ्यात राज्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आठवड्याच्या अखेरीस राज्यभरात थंडीमध्ये वाढ होणार आहे. याच काळात दक्षिणेकडून बाष्पीयुक्त वारे राज्यात येणार आहे. बाष्पयुक्त हवा आणि थंड वाऱ्याच्या घुसळणीमुळे विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक येथे गुरुवारपासून रविवारपर्यंत पावसासह गारपिटीचा अंदाज आहे. नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती आणि बुलढाणा येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तर महाराष्ट्रात केळी, द्राक्ष, पपईसह भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात, त्यामुळे गारपीट झाल्यास उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्याच्या अन्य भागांत ही पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. मात्र, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यास रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गारपिटीची शक्यता का वाढली?

सध्या राजस्थानच्या आग्नेय भागातून देशात अति थंड वारे किंवा पश्चिमी थंड वारे देशात प्रवेश करीत आहेत. साधारण समुद्रसपाटीपासून दीड ते दोन किलोमीटर उंचीवरून हे थंड आणि कोरडे वारे भारतात प्रवेश करत आहेत. तर दक्षिणेकडून सरासरी ८०० मीटर उंचीवरून बाष्पयुक्त आणि उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. या वाऱ्यांची घुसळण उत्तर महाराष्ट्रावर होत आहे. थंड वारे आणि बाष्पीयुक्त वाऱ्याच्या घुसळणीने साद्रीभवन होऊन गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे. राज्याच्या अन्य भागात गारपीटीची शक्यता कमी असली तरी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने  दिली आहे.

पाऊस, गारपिटीचा अंदाज : धुळे नंदुरबार, जळगाव, नाशिक.

हलका ते मध्यम पावसाचा अंदाज : नगर, पुणे, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा.

इतर बातम्या
Join Whatsapp Group