राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसणार ! ''या'' 29 जिल्ह्यांना हवामान विभागाचा  अलर्ट
राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसणार ! ''या'' 29 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
img
नंदिनी मोरे
राज्यातील हवामानात कमालीचे बदल होत असून राज्यभरात पावसानं कहरच केला आहे. एप्रिल महिन्यात उकाड्याने तापलेल्या वातावरणात अचानकच मे  महिन्याचा सुरुवातीपासूनच  पावसाने धुमाकूळ घातला आहे.  पुढील 24 तासांत देखील राज्यातील बहुतांश भागात वादळी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 24 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


पुढील काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचं सावट कायम असणार आहे. दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहून मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल. तर उत्तरेतील ठाणे, पालघर वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये.

मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली, सोलापूर आणि धुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारा वाहून विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विदर्भामध्ये देखील पुढील काही दिवस पावसाचे सावट कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो. पुढील काही दिवस वातावरणाची स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकरी, मच्छीमार, सर्वसामान्य नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group