राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला आहे. महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली आहे. वाऱ्याची चक्राकार दिशा आणि अरबी समुद्रात आर्द्रता यामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे.
महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात किमान तापमानात घट होताना दिसत आहे. तसेच येत्या काही दिवसांनी राज्यातील तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या मुंबई , पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र गारठल्याची स्थिती पाहायला मिळत आहे , मुंबईत काल रात्री तापमानाचा पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईतील दादर, परळ, लालबाग यांसारख्या ठिकाणी 18-19 अंश इतके तापमान नोंदवण्यात आले. तर मुंबई उपनगरात अंधेरी, घाटकोपर या भागात तापमानाचा पारा 16-17 अंशापर्यंत घसरला होता. तर मालाड, कांदिवली, गोरेगाव, बोरिवली, मुलूंड, ठाणे या भागात 15-16 अंश कमी तापमानाची नोंद करण्यात आली.
मुंबईतील थंडीची तीव्रता पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. सध्या मुंबईत सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. मुंबईतील दृष्यमानताही कमी झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा परतला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आला आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज असल्याने थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. तर आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे.
तर दुसरीकडे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे. पुण्यातील कमाल तापमान ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. तर किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या आसपास असल्याने थंडीचा कडाका कमी जास्त होताना दिसत आहे.
आज राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा ८ अंशापर्यंत खाली आला आहे. मंगळवारी जळगाव शहराचे तापमान ८.२ अंश इतके नोंदले गेले. भारतीय हवामान खाते व ममुराबाद वेधशाळेकडे ही नोंद करण्यात आली आहे. आगामी दोन दिवस थंडीचा जोर वाढणार असला तरी येत्या ११ जानेवारीपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे.