राज्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून कमालीचे बदल होत आहेत. राज्यात कमी झालेल्या थंडीने पुन्हा एकदा जोर धरल्याचे चित्र आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील किमान तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान , उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा जोर कायम आहे. नाशिकमध्ये निरभ्र आकाश राहणार आहे तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस एवढे राहील.
मुंबई शहर आणि उपनगरात मागील काही दिवस कमाल आणि किमान तापमान वाढलेलं असल्याचे पाहायला मिळालं. यामुळे वातावरणात दमटपणा होता. आता मात्र मुंबईतील किमान आणि कमाल तापमानात घट पाहायला मिळत आहे. 20 डिसेंबर रोजी मुंबई येथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढे राहील. तर आकाश सामान्यतः निरभ्र राहील.
तसेच, पुण्यामध्ये मागील तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका पाहायला मिळतोय. किमान तापमान 10 अंशांच्या ही खाली आल्याचं पाहायला मिळत आहे. 20 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये काहीस धुके पाहायला मिळेल तर आकाश ढगाळ असेल. तर पुण्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस एवढे राहणार आहे.
दरम्यान, मराठवाड्यामध्ये देखील पुन्हा एकदा थंडी परतली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 24 तासांत आकाश निरभ्र राहून कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.