राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार होत असून अंशत: ढगाळ वातावरण असल्याने नागरिकांना पहाटे गारठा आणि दुपारी तीव्र उन्हा्चा चटका सहन करावा लागत आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 1-3 अंशांनी तापमान घसरले होते. तर कोकण, मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत 1-3 अंश अधिक तापमानाची नोंद होतेय.
सध्या उत्तरेकडील राज्यात दाट धुक्याची चादर पसरली आहे. हवेत चांगलाच गारठा असून कोरडे थंड प्रवाह महाराष्ट्रात पसरले आहेत. परिणामी, येत्या काही दिवसात राज्यात गारठा काहीसा वाढणार आहे. तर दुसरीकडे पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारसा बदन नसून त्यानंतर हळूहळू तापमानात 2-3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार , चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या असाम आणि परिसरात सक्रीय आहे. गुजरातपासून राजस्थानसह बंगालच्या उपसागरात नैऋत्य भागात पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे वायव्य भारतात पश्चिमी वाऱ्यांचे झोत वाहतायत. याचाच परिणाम म्हणून थंडी कमी जास्त होत आहे.
येत्या पाच दिवसात महाराष्ट्रात तापमान कसे?
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 3-4 दिवसांत कमाल तापामानात फारसा बदल होणार नाही. किमान तापमान येत्या 3 दिवसांत 3-4 अंशांनी कमी होणार आहे. आणि त्यानंतर हळूहळू त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भात येत्या दोन दिवसात किमान आणि कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून त्यानंतर तापमान 2-3 अंशांनी घसरेल असं सांगण्यात आलं आहे.
राज्यात पुढील पाचही दिवस कोरड्या हवामानाची शक्यता असून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत असल्याने गारठा वाढणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान काहीसे वाढले होते. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडा सहन करावा लागला. आता तापमानात पुन्हा घट होणार आहे.