पुणे : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यात बघायला मिळतंय. अवकाळी आणि गारपिटचे ढग राज्यावर आहेत. पावसाला पोषक वातावरण आहे. लातूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलाय.
अशातच आज हवामान खात्याकडून मोठा इशारा देण्यात आलाय. पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. काल राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस झाला. आजही तिच परिस्थिती असणार आहे. काही ठिकाणी पाऊस, वादळी वारा आणि गारपिट होणार आहे. मुळात म्हणजे हवामान खात्याकडून संपूर्ण राज्यासाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय.
येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणामध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. सांगली, सातारा, खटावमध्येही पावसाची नोंद झालीये.
दुसरीकडे ब्रह्यपुरीत तापमान वाढताना दिसतंय. काल बह्यपुरीत तापमान ४०.२ पर्यंत पोहोचले होते. यवतमाळ, सोलापूर, चंद्रपूर, परभणी, धुळे, धाराशिव, निफाडमध्ये पारा वाढताना दिसतोय. अकोला आणि अमरावतीमध्येही आज अवकाळी पावसासोबतच गारपीटचा ऑरेंज इशारा देण्यात आलाय.
मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी उकाडा वाढल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गारपीट, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. गारपिटचे मोठे संकट सध्या राज्यासमोर असल्याचे बघायला मिळतंय.
पुढील दोन दिवस अवकाळीचे ढग कायम असल्याचेही बोलले जातंय. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट आहे.