महाराष्ट्रात चार ते पाच दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातलाय. राज्यात आजही अवकाळी पाऊस होईल , असा इशारा हवामान खात्याने दिला होता. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यातील अनेक भागात दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
मुंबईच्या उपनगरीय भाग असलेल्या कल्याण-डोंबिवलीमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दुपारच्या सुमारास कल्याण डोंबिवलीत वादळी वारा वाहू लागला. काही क्षणातच कल्याण-डोंबिवलीत रिमझिम पावसाला सुरुवात झाली.
संभाजीनगर जिल्ह्यालाही अवकाळी पावसाने झोडपलं आहे. जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, फुलंब्री तालुक्यात गारा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील मका, गहू, हरभरा, कांदा या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालाय. पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली जातेय.
बदलापुरात धुळीचे वादळ
बदलापुरात दुपारच्या सुमारास अचानक धुळीचे वादळ आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या वादळाचा वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. गेले दोन-दिवस बदलापूर आणि ग्रामीण परिसरातही तापमान वाढले होते. आज दुपारच्या सुमारास अचानकपणे ढग दाटून आले. त्यानंतर दुपारी धुळीचं वादळ आल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांची तारांबळ उडाली. बदलापूर आणि वांगणी परिसरात पावसाच्या तुरळक सरीही कोसळल्या.
मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर लोकलवर परिणाम
वादळी वाऱ्याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर लोकलवर परिणाम झाला. आटगाव आणि थानशेत स्टेशनच्या दरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये पत्रा अडकल्याची घटना घडली. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळं बाहेरुन पत्रा उडून ओव्हर हेड वायरवर येऊन पडला आहे. यामुळे कसऱ्याहून कल्याणकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. एक लोकल १५ मिनिटे तर त्यामागे एक एक्सप्रेस ८ मिनिटे थांबली होती.
पुणे जिल्ह्यातही अवकाळी पाऊस
जुन्नर तालुक्याच्या पिंपरी पेंढार परिसरात गारपिटी सह जोरदार अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली. सलग दुस-या दिवशी गारपीटीच्या या तडाक्याने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झालं. यामुळे बळीराजा शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. गारपिटीमुळे गहू, कांदा, द्राक्ष डाळिंब यांसारख्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह गारपीट होत आहेत. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आज दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.
अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे लोखोंचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने आंबा बागायतदार शेतकरी हवादिल झालेत. वीस ते २५ वर्षाचे आंब्याचे झाड भूईसपाट झाले असून आता पुन्हा नव्याने आंब्याची झाडांची लागवड करावी लागेल. याकरीता लागणारा पैसा कुठून आणायचा याची चिंता शेतकऱ्यांना पडलीय.
दरम्यान हवामान विभागानं पुढील तीन दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केलाय. राज्याच्या विविध भागात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.