राज्यात येणार थंडीची लाट !  ''या'' जिल्ह्यांत वाढणार सर्वाधिक हुडहुडी,   हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात येणार थंडीची लाट ! ''या'' जिल्ह्यांत वाढणार सर्वाधिक हुडहुडी, हवामान विभागाचा अलर्ट
img
दैनिक भ्रमर

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीने जोर  धरला आहे.  राज्यातील विविध जिल्ह्यांत किमान तापमानात घट नोंदवल्या गेली आहे. तर पुणे, नागपूर आणि नाशिक या शहरांतील किमान तापमान हे 9 ते 11 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. तर मुंबईतील किमान तापमानात 8 ते 10 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. पुढील 24 तासांत राज्यात हवामान कोरडे असणार आहे. कुठलीही पावसाची शक्यता नाही. तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ आकाश असण्याची शक्यता आहे. 

तसेच , 11 डिसेंबरला मुंबई शहर आणि उपनगरात मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. 2 दिवस आधी मुंबईतील किमान तापमानात घट झालेली दिसून येत होती. आता मात्र मुंबईतील किमान तापमानात 8 ते 10 अंशांनी वाढ झालेली बघायला मिळत आहे.

पुण्यामध्ये 11 डिसेंबरला धुक्यासह ढगाळ आकाश असून पुण्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतके असेल. पुण्यातील किमान तापमानात झपाट्याने घट झालेली दिसून येत आहे. पुढील 24 तासांत पुण्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

11 डिसेंबरला छत्रपती संभाजी नगरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहणार असून येथील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधील किमान तापमानात देखील घट झाली असून थंडीचा कडाका वाढणार आहे. तसेच, 11 डिसेंबरला नागपूरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये पुढील 24 तासांत अंशतः ढगाळ आकाश असणार आहे. विदर्भातही आता थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान , नाशिकमध्ये 11 डिसेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश असून तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं असणार आहे. नाशिकमधील थंडीचा जोर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. 10 डिसेंबरला नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद होती. नाशिकमधील किमान तापमान 3 अंशांनी वाढले आहे. राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील किमान तापमानात सर्वाधिक घट नोंदवल्या गेली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group