फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावानंतर राज्यात येत्या 24 तासांत गारठा वाढू लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाला पोषक स्थिती होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाा पट्टा कमकुवत झाला असून राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहणार आहेत.
येत्या 4 दिवसात महाराष्ट्रात तापमानात घट होणार असून 3 ते 4 अंशांनी तापमान कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. पुण्यात आज 14 ते 15 अंश सेल्सियस तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर आजपासून महाराष्ट्रात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता
वर्तवण्यात येत आहे.
राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होते. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. थंडीचा जोर पूर्णपणे कमी झाला, तर काही भागात उकाडा जाणवू लागला आहे. 9 डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे, तर 8 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे.
राज्यात मागील 3 दिवसांपासून ढगाळ व दमट हवामान होते. थंडी गायब झाली होती. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वारे थांबवल्यानं अरिबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा वेग वाढून पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली होती. आता कमी दाबाचा हा पट्टा ओसरला असून कोरडे वारे राज्यभर वाहणार आहेत.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान घटणार
फेंगल चक्रीवादळाच्या इफेक्टनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान घटणार असून हवामान शुष्क आणि कोरडे राहणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. किमान तापमानात 3-4 अंशांनी घट होणार असून येत्या 24 तासांत तापमानाचा पारा घसरणार आहे. दरम्यान, पुण्यात आज 14 ते 15 अंश सेल्सियस तापमानाची शक्यता आहे.
विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज
राज्यात आता पावसाला पोषक स्थिती कमी झाली असली तरी आज विदर्भात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज पूर्व व पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात किमान तापमानात येत्या चार दिवसात फारसा बदल होणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. दोन दिवसांनी तापमान 2-3 अंशांनी घसरू शकते असा अंदाज देण्यात आला आहे.