राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळीने हाहाकार केला आहे. भर उन्हाळ्यात पावसाने अचानक हजेरी लावल्याने मात्र सर्वांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस धडकणार असल्याची महती समोर आली आहे. बुधवारी, 14 रोजी राज्यात वादळी पावसाची शक्यता असून विदर्भातील 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात बुधवारी हवामान ढगाळ आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांत तापमान 32 ते 36 अंश सेल्सियस दरम्यान राहील, तर काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी किंवा वादळी वाऱ्याचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील, ज्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागेल.
मुंबईत उद्या सकाळी हवामान मुख्यतः ढगाळ राहील, तर दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सियस आणि किमान 28 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातही तापमान 32 अंशांपर्यंत जाईल आणि संध्याकाळी काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे (30-40 किमी/तास) आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र तापमान 35 ते 36 अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे उष्णतेची लाट कायम राहील. या भागात देखील वादळी पावसाची शक्यता असून विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पाण्याची बाटली आणि छत्री सोबत ठेवावी. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, विजांच्या कडकडाटामुळे धोका टाळण्यासाठी खुले मैदान किंवा झाडांखाली थांबणे टाळावे.