मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात विचित्र बदल होताना दिसून येत आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. आता विदर्भात सुद्धा हवामानात मोठे बदल जाणवत आहेत.
दिवाळीनंतर विदर्भात गारठा वाढला होता. आता पुन्हा हवामानात बदल होत असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळे विदर्भवासीयांना नव्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे.
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून धुक्यासह ढगाळ आकाश आहे. आज 30 नोव्हेंबरला देखील हिच स्थिती कायम राहणार आहे. तर 1 ते 3 डिसेंबर दरम्यान विदर्भात काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
आज अमरावती, अकोला, भंडारा या तीन जिल्ह्यांतील किमान 16 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. तर नागपूर, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यातील किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. शुक्रवारच्या तुलनेत सर्वच जिल्ह्यांत तापमानात काहीशी वाढ झाली आहे.
गोंदियात सर्वात कमी 13 अंश तर वाशिममध्ये 14 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. या ठिकाणी थंडीचा जोर कायम आहे. तर रविवारपासून अकोला, यवतमाळ, बुलढाणा आदी जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता आहे.