पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा चटका! राज्यात  पुढील 5 दिवस कसे असेल हवामान ? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा चटका! राज्यात पुढील 5 दिवस कसे असेल हवामान ? वाचा हवामान विभागाचा अंदाज
img
Dipali Ghadwaje

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून हवामानात बदल दिसून आले आहेत. राज्यात पुढील पाच दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने लावला आहे.

काही दिवसांपासून राज्यात पहाटे प्रचंड गारठा आणि दुपारी तीव्र उन्हाचा चटका यांचा अनुभव नागरिक घेत आहेत. तसेच पुणे आणि इतर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमान 1 ते 3 अंशांनी वाढले असून, तापमान स्थिरावले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हवामान पुढील पाच दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव दिसणार आहे .  

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तापमानात सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मराठवाड्यात पुढील 3 ते 4 दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होईल. त्यानंतर हळूहळू तापमान कमी होईल. विदर्भात मात्र, पुढील 48 तास तापमानात फारसा बदल होणार नाही.

राज्यात तापमानाची स्थिती काही ठिकाणी 10° ते 19° सेल्सिअस दरम्यान नोंदवली जात आहे. पुण्यात किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान होत आहे.

नाशिक, कोल्हापूर, नगर, सातारा आणि सोलापूर सारख्या ठिकाणी तापमान 11° ते 16° सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे. मराठवाड्यात तापमान साधारणपणे 14° ते 17° सेल्सिअस दरम्यान राहत आहे. विदर्भातील काही ठिकाणी, जसे भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात किमान तापमान 10° ते 13° सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळालं आहे.
 
मराठवाड्यात हवामान  अधिक कोरडे राहण्याची शक्यता आहे. 22 आणि 23 जानेवारी रोजी उत्तर भागात सकाळी धुके राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तापमानातील कमालीचा बदल नसून, दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात हळूहळू वाढ होईल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group