गारठा वाढला! शिमला- धुळ्यातील तापमान एकसारखं...वाचा संपूर्ण बातमी
गारठा वाढला! शिमला- धुळ्यातील तापमान एकसारखं...वाचा संपूर्ण बातमी
img
Dipali Ghadwaje
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम आता पूर्णपणे विरला असून, देशभरामध्ये थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यांसमवेत मैदानी क्षेत्रांमध्येही तापमानात घट नोंदवण्यात येत असून, इथून वाहणाऱ्या शीतलहरींनी देश व्यापण्यास सुरुवात केली आहे. 

महाराष्ट्रात प्रामुख्यानं उत्तरेकडील क्षेत्रामध्ये किमान तापमान आठ अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळं इथं गारठा कमालीचा वाढल्याचं लक्षात येत आहे. तर, धुळ्यात मंगळवारी तापमानाचा आकडा 4 अंश इतक्या निच्चांकी पातळीवर आल्यानं तिथं हिमाचल प्रदेशातील शिमल्यामध्ये दिवसा जाणवणारं तापमान एकसारखं असल्याचं आढळून आलं.

दरम्यान, राज्यात असणारा हा थंडीचा कडाका पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या थंडीच्याकडाक्यासमवेत महाराष्ट्राच्या थंडीवर थेट पाकिस्तानहून वाहत येणाऱ्या वाऱ्यांचाही परिणाम पाहायला मिळत आहे. पाकिस्तानातून जमिनीलगत वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळं राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढताना दिसत आहे. 

राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा 3 ते 4 अंशांनी घटला असून उत्तर महाराष्ट्र वगळता सध्या महाराष्ट्रातील पहाटेचं किमान आणि दुपारचं कमाल तापमान सरासरीच्या आकडेवारीनजीकच पाहायला मिळत आहे. 

देशातील उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून, पश्चिमी झंझावातामुळं ही थंडी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवत 18 डिसेंबरपर्यंत हे चित्र बदलणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. परिणामी पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान नऊ अंशांच्या खाली येण्याचा अंदाज असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 
 

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group