राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. मुंबई-पुणे यांसारख्या महानगरामध्येही तापमानात घट झाली आहे. मुंबईत पुढील काही दिवसांमध्ये तापमान अधिक घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रात तापमानात फारसा बदल होणार नसल्याची माहिती दिली आहे. याचा अर्थ राज्यात अजून काही दिवस गारवा कायम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील तापमानात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. या भागांमध्ये पुढील २४ तासांत किमान तापमानात बदल होणार नाही. त्यानंतर तीन दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसने तापमानात हळूहळू वाढ होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
याव्यतिरिक्त विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तापमान स्थिर राहील. या आठवड्यातील पुढचे चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार आहे. तेथील कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. तसेच पुढच्या २४ तासांमध्येही वातावरणात फारसा बदल होणार नाही. विदर्भात वातावरणात गारवा टिकून राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची स्थिती झाली होती. हिवाळ्यात पाऊस आल्याने ढगाळ वातावरण तयार झाले होते. ढगाळ वातावरणामुळे जळगावसह इतर जिल्ह्यातील रब्बी पिकांना फटका बसला. त्यामुळे राज्यातील गारठा कमी झाला होता. आता राज्यात ठिकठिकाणी गारवा वाढल्याचे पाहायला मिळते.