राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून डिसेंबरच्या सुरुवातीला जोर धरलेली थंडी महिन्याच्या शेवटी कमी झाल्याचे जाणवले. दरम्यान आता पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला थंडीने जोर धरला आहे. सध्या विदर्भात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ही थंडीचा जोर वाढलेला दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत नाशिकमधील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे..
मुंबई शहर आणि उपनगरात उद्या म्हणजेच, 4 जानेवारीला निरभ्र आकाश असल्याचे बघायला मिळणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. तर पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमानात पुढील काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 जानेवारीला निरभ्र आकाश असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील किमान तापमानात घट झाल्याने तेथील नागरिकांना गुलाबी थंडी जाणवणार आहे.
विदर्भातील नागपूरमध्ये 4 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. विदर्भातील किमान तापमानात सर्वाधिक घट झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नागपूरमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भात आता थंडीचा जोर वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.