संपूर्ण देशभरात मान्सूनसाठी पूरक स्थिती निर्माण झालेली असताना या मान्सूनमुळं सर्वाधिक प्रभावी भाग ठरत आहे तो म्हणजे दक्षिण भारत. गुजरातपासून दक्षिण भारतापपर्यंत सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं सध्या या पट्ट्यादरम्यान येणाऱ्या सर्व राज्यांवर पावसाची कृपा दिसून येत आहे. महाराष्ट्रातही पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या किनारपट्टी भागासह पश्चिम घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावरील भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच धर्तीवर पुढील 24 तासांसह शुक्रवार आणि शनिवारपर्यंत सतर्क राज्याच्या पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानाच सामन्यपेक्षा किंचित वाढ होणार असून, पावसाच्या हलक्या सरींची बरसरा होण्याचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून, यादरम्यान ताशी 30-40 किमी वेगानं वारे वाहणार असल्याचा इशारासुद्धा हवामान विभागानं दिला आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मान्सूनचा जोर वाढलाय...
सध्या महाराष्ट्राच्या उत्तर भागापासून उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळं अरबी समुद्रातील बाष्पयुक्त हवा वेगाने किनारपट्टीच्या दिशेनं वाहत आहे. परिणामी किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूरसह सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पालघर आणि विदर्भासह मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथं पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपातील सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.