पुणे : पुण्यात रात्रीपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. सततच्या पावसामुळे पुण्यातील अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यातच खडकवाला धरणाचं पाणी सोडल्याने परिसरात छातीपर्यंत पाणी भरलं आहे. त्यामुळे लोकांना होडीच्या मदतीने बाहेर काढलं जात आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तर, पुण्यात येत्या काही तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, तसेच ग्रामीण भागातील खडकवासला , भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. पुढच्या 24 तासांतही मुसळधार पावसाची नोंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच पुणे हिंगणे खुर्द, साई नगर येथे डोंगरमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने अग्निशमन दल रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
यासोबतच ते म्हणाले की, गरज पडताच नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे माझे आवाहन आहे. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.