राज्यातील अनेक जिल्ह्यांत सध्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (ता.१) त्र्यंबकेश्वसह अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडल्याच बघायला मिळालं, दरम्यान या पावसाच्या पाण्याचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसताना दिसत आहे.
आज सकाळपासून धबधबे, नद्या, धरण, दुथडी भरून वाहतांना बघायला मिळत आहे. काल मध्यरात्रीपासून नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
अशातच काल (मंगळवारी) रात्री त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात तुफान पाऊस झाला आहे. यात त्र्यंबक शहरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचे दिसून आले.
दरम्यान, त्र्यंबकमधील गंगा सागर तलाव भरून उलटल्याने संपूर्ण शहरात पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. तसेच लोक झोपेत असताना पावसाचे पाणी घरे आणि दुकानांमध्ये शिरले होते. तर मेनरोड वरील रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. काल रात्री झालेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे.