गंगापुर धरण 'इतके' टक्के भरले,  इतर धरणांची 'ही' आहे स्थिती...
गंगापुर धरण 'इतके' टक्के भरले, इतर धरणांची 'ही' आहे स्थिती...
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- गेले दोन-तीन दिवस नाशिक शहर व जिल्ह्यात अल्पकाळ; परंतु अत्यंत जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने गंगापूर धरण 97 टक्के भरले असून, इतर धरणांचाही पाणीसाठा वाढलेला आहे. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, हा पाऊस आणखी दोन-तीन दिवस चालू राहील, असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे.
अचानक येणाऱ्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणात 5 हजार 451 दशलक्ष घनफूट पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाची क्षमता 5630 दशलक्ष घनफूट असल्याने सध्या तरी धरण 97 टक्के भरले असून, असाच पाऊस चालू राहिल्यास लवकरच ते शंभर टक्के भरेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी या काळात गंगापूर धरण 100 टक्के भरले होते. नाशिकजवळच्या इतर धरणांतही पाणीसाठा वाढलेला आहे. काश्यपी धरणात 1755 दशलक्ष घनफूट पाणसाठा असून, ते 94 टक्के भरले आहे, तर आळंदी धरणदेखील 100 टक्के भरले आहे. गंगापूर धरण समूहातील या विविध धरणांत एकूण 96 टक्के पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील बहुतेक धरणे 80 ते 100 टक्के भरली असून, धरणनिहाय पाणीसाठा टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. पालखेड (98 टक्के), करंजवण (100), वाघाड (100), ओझरखेड (97), पुनेगाव (97), दारणा (100), भावली (100), मुकणे (90), वालदेवी (100), कडवा (99), नांदूरमध्यमेश्वर (100), भोजापूर (95), चणकापूर (97), हरणबारी (100), केळझर (100), पुनद (98).
काही धरणांमध्ये मात्र अद्याप पुरेसा जलसाठा झालेला नाही. त्यामध्ये गिरणा धरण (55 टक्के), माणिकपुंज (19 टक्के) यांचा समावेश आहे. एकूणच अपवाद वगळता जिल्ह्यात सध्या तरी धरणांतील जलसाठा समाधानकारक आहे. गेल्या काही वर्षांपासून डिसेंबरपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी येत आहेत. या वर्षीदेखील दिवाळी सणापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी उपलब्धता समाधानकारक राहणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group