महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने कित्येक गावांना अक्षरश झोडपून काढले आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पुर्णपणे पाण्याखाली गेल्याचे चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसून आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. भरणे म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. हवामान बदलामुळे एकाच वेळेस मोठा पाऊस होतोय. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 30 जिल्ह्यात 195 तालुक्यात 654 महसूल मंडळामध्ये 62 लाख 17 हजार 540 एकर क्षेत्रात शेती पिकाचे नुकसान झाले आहे.
यावर सरकारचे लक्ष आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, अधिकारी नुकसानीची पाहणी करत आहे. ज्यांचे नुकसान झाले, त्याबाबत पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
या जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान
नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, दरम्यान, नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे या जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. उडीद, तूर, मूग , सोयाबीन, मका, कापूस या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांना फटका बसला आहे.