गेल्या काही दिवसांपासून देशभरातील वातावरणात कमालीचे बदल होत आहेत. कड्याक्याच्या उन्हाने तळपलेल्या नागरिकांना आता थंडावा मिळणार आहे. अचानक वाढलेल्या उकाड्यानंतर आता देशासह राज्यात मुसळधार पाऊस बरसणार आहे.
देशातील अनेक भागांमध्ये सध्या कडाक्याचं ऊन पडत आहे. तपमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे रस्ते सुनसान झाले आहेत. याचदरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागानं देशातील अनेक भागांमध्ये वादळी वारा आणि विजांसह अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला असून, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आयएमडीनं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आयएमडीकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात 40-50 किमी प्रति तास वेगानं वारे वाहन्याची शक्यता आहे.
दरम्यान दुसरीकडे महाराष्ट्रसह इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, सिक्कम आणि जम्मू -काश्मीरच्या देखील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र हवेत गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.