एप्रिल महिन्याच्या कडकडीत उन्हाळयानांतर आता मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने राज्यात दमदार एंट्री केली आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु असून हवामान विभागाने राज्याला अलर्ट दिला आहे.
राज्यात 22 मे रोजी पावसाची शक्यता कायम आहे. अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. मुंबईत ढगाळ आकाश राहून जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तेथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. पुण्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून तेथील तापमान 22 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं.

राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्या नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा या भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात अधिक तीव्रतेने पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील वातावरण ढगाळ आणि पावसाळी राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे.