कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी घातली होती, त्यावेळी कांद्याचे दर नियंत्रणात होते. मात्र कांद्यावरील निर्यात खुली होताच कांद्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव तब्बल ५०० रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कांद्याला चांगला भाव मिळत आहे. निर्यातबंदी हटवल्याने कांद्याचे भाव प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वधारले आहेत.
केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. परंतु हा निर्णय आधी घेतला असता, तर शेतकऱ्यांना यापेक्षाही अधिक फायदा झाला असता, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपला माल विकून टाकलेला असून आता बाजारात येणारा कांदा अल्प प्रमाणात राहणार आहे.
सध्या स्टॉक करण्याचं सीजन असल्यामुळे काही व्यापारी आणि शेतकरी कांद्याचा स्टॉक करू शकतात. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याला आणखीच चांगला भाव मिळू शकतो, असंही कांदा व्यापाऱ्याने सांगितलं आहे.
दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देखील सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कांद्याचे भाव आणखीच वाढले, तर शेतकरी स्टॉक केलेला कांदा बाजारात आणतील. त्यामुळे मागच्या वेळी कवडीमोल दराने मिळालेल्या भावाची यात थोडीफार कसर भरून निघेल, असं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केलेली होती. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत होता. कांद्याचे भाव झपाट्याने खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता.
त्यामुळे केंद्र सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. आता केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी हटवून १ मॅट्रिक टन कांद्यासाठी ५५० डॉलर्स निर्यात मूल्य निश्चित केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळात कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.