नाशिक (प्रतिनिधी) :- कांदा निर्यात शुल्क वाढवल्याने स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर कोसळले असून शेतकरी देशोधडिला लागला आहे. तसेच टोमॅटोला चांगले भाव मिळत असताना बाहेरुन आयातीचा निर्णय घेण्यात आला. या शेतकरी विरुध्द धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस (शरद पवार गट) आज (दि.२३) सकाळी दहा वाजता शिंदे टोलनाक्यावर जोरदार आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड व शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी दिली.
मुंबईनाका येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्यांनी केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांवर सडकून टीका केली. यावेळी माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, रतन चावला व बहुजन शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मागील तीन वर्षांपासून कांदा उत्पादकांना भाव मिळाला नाही. उत्पादन खर्च वसूल न झाल्याने शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ आली. आता कुठे कांद्याला क्विंटलला तीन हजार भाव मिळत होता. परंतु केंद्र सरकारने निर्यात शुल्क चाळीस टक्के केले. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर कोसळले. कांदा तीनशे ते चारशे रुपये क्विंटलने विकला जात आहे. टोमॅटोचेही तेच पहायला मिळाले. कधी नव्हे ते टोमॅटोला दोन हजारचा भाव मिळाला. पण केंद्र सरकारने बाहेरील देशातून टोमॅटो मागवले व दर कोसळले. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरी देशोधडिला लागला असल्याचा घणाघात त्यांनी केला. त्या निषेधार्थ आज शिंदे पळसे टोलनाका येथे आज रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या आहेत प्रमुख मागण्या
- कांदा निर्यातीवरील शुल्क मागे घ्यावे
- टोमाॅटो आयात बंद करावी
- शेतकर्यांचे वीज बील माफ करावे
- जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करावा