नाशिक ( भ्रमर प्रतिनिधी ) : नाशिक जिल्हा हा कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या २५ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प होते. सहकार विभागाने दिलेला कारवाईचा इशारा, व्यापारी, बाजार समित्या व काही हमाल मापारींनी घेतलेली सकारात्मक भूमिका यामुळे आज सोमवारपासून (दि.२२) मनमाड व नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता जिल्ह्यातील इतर सर्व १३ बाजार समित्या व उप बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले. त्यामुळे कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.
विशेष म्हणजे सकाळपासून बाजार समित्यांमध्ये कांदा घेऊन आलेले ट्रॅक्टर लिलावासाठी रांगेत उभे होते. पहिल्या दिवशी कांद्याला कमीतकमी ११०१ ते सरासरी १३६० चा भाव मिळाला.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र कांदा व इतर मालाची लिलाव प्रक्रिया सुरूच होती. त्यामुळे या बाजार समितीत नुकसान झाले नसले तरी इतर १४ बाजार समित्यांत मात्र कोट्यवधीचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. पहिल्या खूप नुकसान झाले हाेते. नंतर हा नंतर अजून वाढला. लेव्हीच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिल्याने बाजार समित्या बंद होत्या.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या पावतीमधून कपात केलेले माथाडी कामगारांचे १३६ कोटी रुपये लेव्ही २००८ पासून व्यापाऱ्यांकडे थकले आहेत. ही रक्कम जमा करण्यास व्यापारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून हमाल मापारी करीत आहेत. याच प्रश्नावरून व्यापाऱ्यांनी २५ दिवसांपासून लिलाव बंद ठेवले होते. कांदा काढणीचे काम वेगात सुरू असताना कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते. बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून परवाने रद्द करण्याचा इशारा दिला असतानादेखील चांदवड, लासलगाव, दिंडोरी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी व्यवहार ठप्पच होते. कांदा काढणीचे काम वेगात सुरू झाले असताना व्यापारी, हमाल मापाडी व बाजार समित्यांच्या वादात शेतकरी मात्र चांगलाच भरडला जात होता.
बाजार समितीत हमाली, ताेलाई कपात न करताच लिलाव हमाल, मापाऱ्यांनी विरोध करूनही व्यापाऱ्यांनी मात्र हमाली, ताेलाई कपात न करताच लिलाव सुरू केले. त्यामुळे कामगार व हमाल संतप्त झाले. परिणामी ४० टक्के कामगार, हमाल कामावर हजर झालेच नाही. परंतू आहे त्या हमालाच्या भरवशावर लिलाव सुरू झाले. फक्त लासलगाव येथेच प्रचलित (जुन्या) पद्धतीने लिलाव सुरू झाल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली.