नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- तीन दिवसांच्या बंद नंतर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव सुरू झाले. मात्र सुरूवातीला कांदा लिलावात योग्य भाव मिळत नसल्याने लासलगावसह पिंपळगाव आणि येवला येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.
जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. परंतु शेतकऱ्यांचा मात्र प्रतिसाद नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कांद्याला अडीच हजार रुपये भाव दिल्यानंतर हे भाव कमी झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगाव येथील लिलाव देखील बंद पडले आहेत. केंद्र सरकारने निर्यातीवर 40 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव व व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला होता, तर जिल्ह्यातील संतप्त झालेल्या शेतकरी वर्गाने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून आंदोलने केली होती.
यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनामध्ये अग्रभागी असल्याचे समोर येत होते. सर्व प्रश्नांची चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काल बैठक बोलावली होती. या बैठकीला व्यापारी, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, नाफेडचे अधिकारी, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये व्यापारी असोसिएशनने आजपासून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आज कांद्याचे लिलाव सुरू झाले. लासलगाव या आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांद्याच्या बाजारपेठेमध्ये 200 ट्रॅक्टर लिलावासाठी आले होते. या ट्रॅक्टरला नाफेडने दिलेल्या भावापेक्षा 90 रुपये भाव हा सुरुवातीला जास्त मिळाला आहे. म्हणजेच लासलगाव येथे पंचवीसशे रुपये क्विंटलने कांदा खरेदी केला जात आहे.
दरम्यान, दुसरीकडे कांद्याची बाजारपेठ असलेल्या येवला आणि पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आणि व्यापाऱ्यांनी हा कांदा खरेदी न करता हा कांदा नाफेडने खरेदी करावा, अशी मागणी करीत लिलाव सुरू होऊ दिले नाही. पिंपळगाव आणि येवला या ठिकाणी व्यापाऱ्यांनी 2300 रुपये भाव दिला. हा भाव मान्य नसल्यामुळे लिलाव या ठिकाणी थांबविण्यात आले. पिंपळगाव बसवंत या ठिकाणी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या ठिकाणी यावे, अशी मागणी केली. तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू होणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे या ठिकाणी कांदा लिलाव बंद आहेत.
दरम्यान, लासलगाव येथे सकाळी लिलाव सुरू झाले. परंतु या ठिकाणी पंचवीसशे रुपये भावावरून हा भाव घसरून लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अवघ्या एक तासातच कांद्याचे लिलाव बंद पाडले. नाफेडपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव बाजार समितीमध्ये मिळाला तरच शेतकरी आपला कांदा या ठिकाणी देतील. त्यामुळे या भावाबाबत बाजार समितीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले, नाफेडपेक्षा जास्त भाव हा शेतकऱ्यांना दिला जावा, तरच शेतकरी आपला कांदा हा बाजार समितीमध्ये आणतील अन्यथा यामध्ये शेतकरी भाग घेणार नाही, असा इशारा दिला आहे, असे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भरत दिघोळे यांनी सांगितले